IPL २०१२ साठी नवीन संघ जाहीर - चंपानेर चॅम्पियन्स ( लगान फेम )
मागच्या वर्षी २०११ च्या IPL साठी पुणे आणि कोची असे २ नवीन संघ जाहीर झाले होते , त्याच प्रमाणे यंदाही IPL ऐन भरात असताना, असाच एक धक्का देत एक नवीन संघ पुढच्या वर्षीच्या IPL २०१२ , साठी जाहीर झाला आहे. "चंपानेर चॅम्पियन्स" असं ह्या संघाचं नामकरण करण्यात आलं असून, हा संघ दुसरा तिसरा कुठलाही नाही तर काही वर्षापूर्वी ऐतिहासिक विजय मिळवलेला लगान चा संघ आहे. काल चंपानेर मध्ये झालेल्या मोठ्या शानदार समारंभात ही घोषणा करण्यात आली. संघाचे मालक म्हणजेच चंपानेर संस्थानाचे राजे पुरण सिंग ह्यांनी ह्या समारंभात सर्व मेडिया समोर आपल्या संघाची अधिकृत घोषणा केली.
"चंपानेर चॅम्पियन्स" नी तोच म्हणजे, भुवन , देवा, लाखा, इस्माईल, गोली, कचरा, भुरा, बागा , इस्वर चाचा , अर्जुन आणि गुरन असा विजेता संघ कायम ठेवण्याचं ठरवलं आहे. ह्यापैकी कुणाचीही बेस प्राईस सांगायला राजे पुरण सिंग ह्यांनी नकार दिला परंतु मिळालेल्या रकमेतून पुढच्या अनेक वर्षांच्या "लगान" ची आमची काळजी मिटली आहे असं संघातल्या काही खेळाडूंनी आम्हाला सांगितलं. "के भैय्या छुटे लगान " असं संघाचं घोषवाक्य तर "कोई हम से जीत न पाये .. चले चलो " हे संघाचं थीम सॉंग असेल.
चंपानेर चॅम्पियन्स च्या निमित्तानी पुढच्या वर्षीच्या IPL मध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रथमच पाहायला मिळणार आहेत.
प्रथमच एखाद्या संघाला महिला प्रशिक्षक असणार आहे , कारण विजेत्या संघाप्रमाणेच विजेत्या संघाच्या प्रशिक्षक एलिझाबेथ रसेल ह्यांना कायम ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्या संघानीही "परदेशी प्रशिक्षक" हा सध्याचा ट्रेंड पाळला आहे. "परदेशी बाई" प्रशिक्षक पदी असल्यामुळे खेळाडू राजाचं न ऐकता, फक्त बाईचं ऐकतात आणि त्यामुळे राजाला पुरण सिंग नव्हे तर मनमोहन सिंग असं नाव पडलं आहे ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि माझं संघावर पूर्ण नियंत्रण आहे असं पुरण सिंग ह्यांनी स्पष्ट केलं.
प्रथमच एखाद्या संघात सगळेच्या सगळे भारतीय खेळाडू असून "फोरेन प्लेयर" नसलेला एकमेव संघ आपल्याला पाहायला मिळेल. इतर संघ-मालक वाटेल ती किंमत मोजून फोरेन प्लेयर विकत घेत असताना पुरण सिंग ह्यांनी एकही असा परदेशी खेळाडू का विकत घेतला नाही ह्या प्रश्नाचं उत्तर देताना "गोरी चमडी वाले अपने बाप के सगे नही होते .." असं जरा रागातच उत्तर देऊन त्यांनी विषय बदलला.
प्रथमच एखाद्या IPL संघात शारीरिक अपंगत्वावर मात केलेले २ खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी कचरा हा डाव्या अंगानी अधू असून, बागा हा मुका आहे. ह्याबद्दल बागा ची प्रतिक्रिया विचारली असता तो खूप खुश झाला आणि त्यानी " मला man-of-the-match मिळाल्यावर रवी शास्त्रीच्या त्याच त्याच कंटाळवाण्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागणार नाहीत .. " असं सर्व उपस्थित पत्रकारांना लिहून दाखवलं.
चंपानेर चॅम्पियन्स नी ग्रेसी सिंग हिला चीयर लीडर म्हणून करारबद्ध केलं असून, कुठल्याही खेळाडूंनी चौकार किंवा षटकार मारल्यावर ..
"मैदान मे खिलाडी कोई चौका जो मारे ...
राधा कैसे न नाचे ..राधा कैसे न नाचे ..." ह्या गाण्यावर ती नृत्य करेल.
चीयर लीडर प्रमाणेच , ज्या प्रकारे प्रीती झिंटा किंवा शिल्पा शेट्टी सामना जिंकल्यावर आपल्या खेळाडूंना मिठ्या मारतात, ती देखील कामगिरी ग्रेसी सिंग कडे असेल. परंतु संघातील काही खेळाडूंनी ही कामगिरी चीयर लीडर कडून काढून प्रशिक्षकाकडे सोपवण्यात यावी अशी त्यांची इच्छा आहे असं आम्हाला नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं.
पत्रकार परिषद संपताना काही वादग्रस्त प्रश्नांना पुरण सिंग ह्यांनी उत्तर दिली. त्यापैकी लाखा ह्या खेळाडू वर पूर्वीच्याच सामन्यातील match-fixing ची केस केंव्हाच संपली असून आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे असं पुरण सिंग ह्यांनी सांगितलं तर गोली ह्या गोलंदाजाच्या वादग्रस्त शैली बाबत विचारलं असता मुरली , मलिंगा चालतात तसा गोली पण चालून जाईल असं ते म्हणाले. त्याचबरोबर संघाचा कप्तान भुवन आणि प्रशिक्षक एलिझाबेथ ह्यांच्या मधल्या तथा-कथित प्रकरणा बद्दल विचारला असता "no more questions" असं सांगून त्यांनी समारंभ आणि पत्रकार परिषद संपल्याची घोषणा केली.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीपत्रानुसार आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून असं कळलं आहे की, सौरव गांगुली ह्यानी, किमान चंपानेर चॅम्पियन्स तरी आपल्याला विकत घेईल म्हणून ताबडतोब प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी त्यांनी आपला जुना मित्र शाहरुख खान ह्याला डावलून चंपानेर संघाचा कर्णधार भुवन ह्याच्याशी संधान साधलं आहे. मात्र शाहरुख आणि "भुवन" ह्यांच्यातील संबंध त्यामुळे दुखावले जाण्याची शक्यता आहे असं जाणकारांनी बोलून दाखवलं.
बातमीदार - कौस्तुभ सोमण.