बुधवार, १८ मे, २०११

ओबामाच्या आईची .. अंगाई !!

अमेरीकेनी ओसामाला ठार मारून २ आठवडे होऊन गेले परंतु अजूनही त्याच्यावर झालेल्या कारवाई बद्दल वेगवेगळे तपशील समोर येत आहेत. त्यातलाच सगळ्यात ताजा तपशील असा की जेंव्हापासून पाक मध्ये ओसामा असल्याची खबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ह्यांना मिळाली होती तेंव्हापासून त्यांची झोप उडाली होती. काही केल्या रात्री डोळ्याला डोळा लागेना. अनेक उपाय केले, गरम दुध पिऊन झालं, ए सी कमी जास्त करून पाहिला, कुशी आणि उशी दोन्ही बदलून झालं, अगदी झोपेच्या गोळ्या पण घेऊन झाल्या पण सारं व्यर्थ. झोप काही येईना. अखेर शेवटचा उपाय म्हणून ओबामाच्या आईनी अंगाई गाउन ओबामा ला अगदी लहान बाळासारखं शांत झोपवलं. आज व्हाईट हाउस नी अधिकृतपणे ती अंगाई जाहीर केली, ती अशी : -

पाकिस्तानच्या गावामध्ये ओसामा लपला ग बाई ...
आज माझ्या ओबामाला झोप का ग येत नाही ....

नसे आमच्या देशात, मुशर्रफ म्हणतो बाई
रझा गिलानी सुद्धा , मान्य करतंच नाही
मात्र आपण त्यांच्या, सांगण्यावर जायचं नाही ..
कसाब ला देखील, त्यांनी आपलं मानलं नाही ....

पाकच्या अबोटाबादमध्ये ओसामा लपला ग बाई ...
आज माझ्या ओबामाला झोप का ग येत नाही ....

गुहा नसे ती बाळा, भाग्य बिल्डींग चे भाळी ..
घरातला केर कचरा, कुंपणाच्या आतच जाळी ..
नसे फोन वा इंटरनेट, फेसबुक , यु- ट्युब नाही ..
तरीही दिवसभर त्याचा, वेळ कसा ग जाई ..

पाकच्या अबोटाबादमध्ये ओसामा लपला ग बाई ...
आज माझ्या ओबामाला झोप का ग येत नाही ....

खबर आहे पक्की, ओसामाचा लागलाय माग ..
जेंव्हा केला 'सी आय ए' नी, कुरियरचा पाठलाग ..
तो पळून जायच्या आधी, करायला पाहिजे घाई ..
पाकिस्तान ला न सांगता, करू आता कारवाई ...

पाकच्या अबोटाबादमध्ये ओसामा लपला ग बाई ...
आज माझ्या ओबामाला झोप का ग येत नाही ....

- कौस्तुभ सोमण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: