आजकालच्या जगात फेसबुक हा एक वेगळा देश बनला आहे. प्रत्येक देशात जसे वेगवेगळे लोक एकत्र राहतात तसच फेसबुक च पण आहे. लोकशाही मध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाला जसे आपले विचार प्रकट करण्याचा हक्क असतो तोच हक्क इकडे स्टेटस अपडेट करून बजावता येतो. जस प्रत्येक देशात वेगवेगळ्या संस्कृती येतात आणि जातात तसच फेसबुक वरही अनेक संस्कृती आल्या अन गेल्या. पूर्वी इकडे एकेमेकांना पोक करणारी एक जमात होती. (पोकर बनण्यासाठी काय करावे हे सांगणारा आणि पोक करणे म्हणजे नक्की काय आणि त्यातून पोक करणाऱ्याला किंवा पोक झालेल्याला काय समाधान मिळतं ? पाठीला येणाऱ्या पोकाशी ह्याचा काही संबंध आहे का ? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देणारा ह्या अवघड विषयावरचा "पोकर कसे बनावे" हा लेख लिहून तयार आहे पण त्यावर "पोकर कसे खेळावे" ह्या लेखाच्या लेखकांनी "पोकर" शब्दावर त्यांचा हक्क आहे असा दावा ठोकल्यान तो लेख कोर्टात अडकून राहिला आहे.... असो) त्यानंतर इकडे " माझं प्रोफाईल कुणी कुणी विजीट केलं" हे शोधण्यासाठी हवालदिल झालेली जनता होती. त्या माहितीसाठी ह्या लोकांची कुठल्याही लिंक वर क्लीक करायची तयारी होती. ह्या जमातीची भूतलावरच्या UFO शोधणार्या जमातीशीचतुलना होऊ शकते. दोन्ही जमातीतले लोक "हो ते शक्य आहे पण अजून कुणी सिद्ध करू शकलेल नाही" ह्याच स्थितीत अडकून राहिलेत. अजूनही अश्या जमातीतले लोक अधून मधून आढळतात. त्याच काळात इकडे अनेक लोक फार्मविल च्या माध्यमातून शेती करू लागले होते. मी थक्क झालो जेंव्हा माझा एक शिकागो मध्ये इंजिनिअर असलेला मित्र मला म्हणाला, "आज संध्याकळी घरी गेलो कि कलिंगड उतरवून ठेवायची आहेत उद्या पर्यंत वाया जातील आणि एकाला शेळ्या पण विकायच्या आहेत." हे शेळ्या मेंढ्या गायी म्हशीं लाकूड चाऱ्याची देवाण घेवाण प्रकरण त्या काळात इतक वाढल होता की फेसबुक हा त्या काळातला कृषिप्रधान देश होता. पण ज्या प्रकारे खेड्यातल्या शेतकऱ्याच्या पोराच होत तेच इकडेही झालं आणि लोकांचा शेतीमधला रस संपून लोक शहराकडे धावायला लागले. भारत देशात बॉम्बे च मुंबई झालं, मद्रास चं चेन्नई झालं तसच ह्या देशात पूर्वी ज्या प्रदेशाला "वॉंल" म्हणत त्याला आता "टाईम लाईन" म्हणू लागले. आजकाल इकडे फोटो अपलोड करणारे, चेक इन करणारे, टेंगिंग करणारे, बर्थ डे केंलेन्डर रिक्वेस्ट पाठवणारे किंवा हे सगळं करणारे लोक आढळतात, पण ज्यांच्या पुढे कर जोडावे असे तीनच, लाईककर, कोमेंटकर आणि शेअरकर. यांपैकी तुम्हाला नक्की कोण व्हायचंय लाईककर, कोमेंटकर का शेअरकर ह्या निर्णय प्रक्रियेत तुम्हाला मदत करण्यासाठी दिलेला हा फुकट सल्ला.
ह्या देशाचं नागरिकत्व तुम्ही नव्यानीच स्वीकारलं असेल तर तुम्ही लाईककर होण्यापासून सुरवात केलेली चांगली. लाईककर होणं हे सगळ्यात सोप्प. फेसबुक वर कुठल्याही पोस्टखालचं "लाईक" बटण शोधायच आणि क्लीक कारायचं एवढच काम. सुरवातीच्या काळात तुम्ही ठरविक गोष्टी लाईक कराल, उदाहरणार्थ कुणाला कुठला पुरस्कार मिळाला, कुणाच लग्न ठरल, कुणाला मुलगा-मुलगी काही झालं किंवा कुणाला डिग्री मिळाली नोकरी मिळाली वगरे वगरे. पण त्यावरच थांबलात तर तुम्ही लाईककर होऊ शकणार नाही. समोर आलेली कुठलीही गोष्ट लाईक करता आली कि मगच तुम्ही खरे लाईककर. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गृहपाठ, स्वत:ला कायम एक समजावता आल पाहिजे की , लाईक म्हणजे आवडणे हे साफ चूक आहे. लाईक करणे म्हणजे केवळ नोंद घेणे. एकदा हे मनाशी पक्क झाल की मग, अमुक अमुक चेक्ड इन @ स्टारबक्स, तमुक तमुक ची फ्लाईट लेट झाली, ह्याला तो चित्रपट आवडला नाही , त्याची रात्रीची झोप झाली नाही, अमुक नि तमुक ला पोक केलं ह्यात लाईक करण्यासारखं ते काय? असे क्षुल्लक प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत. एकदा का ते जमल की मग तुम्ही , तुमचा माउस आणि तुमची टाईम लाईन (पूर्वीची वॉंल ) , दिसलं लाईक कर क्लीक दिसलं लाईक कर क्लीक. आता ह्या प्रक्रियेत काही अवघड प्रसंगांना तोंड द्यायची तयारी पाहिजे म्हणजे अनेक जागरूक नागरिक कुठे अपघात झाला, कुठे बॉम्ब स्फोट झाला .. कुणा थोरा-मोठ्या प्रसिध्द व्यक्तीचा निधन झालं तर ती बातमी आपापल्या वॉंल टाईम लाईन वर टाकत असतात. अश्या प्रसंगी निसंकोच पणे ते लाईक करता यायला पाहिजे. त्यावर एखादा कोमेंटकर "कुणी हे लाईक कसं काय करू शकतं?" अशी कोमेंट टाकेलाही पण सराईत लाईककर त्याची ती कोमेंट सुद्धा लाईक करून मोकळा होतो. लाईककर होण्याचा मार्गातला अंतिम टप्पा म्हणजे तुम्हाला स्वत:च टाकलेलं पोस्ट किंवा स्टेटस स्वत:च लाईक करता यायला पाहिजे. तुम्ही स्वत:च ते लिहिलंय म्हणजे तुम्ही ते लाईक करत असणार हे गृहीत आहे , ते ओघानी आलंच. त्यासाठी ते वेगळ लाईक करण्याची गरज काय ? हा प्रश्न ज्या दिवशी तुम्हाला पडणार नाही त्या दिवशी तुम्ही संपूर्ण लाईककर झालात. त्या दिवशी " मी आज लाईककर झालो" अस स्टेटस अपडेट करून ते लाईक करून टाकावं.
आता तुम्हाला कोमेंटकर व्हायचं आहे का ? तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही पुलं चा पुणेकर होण्याचा कोर्स पूर्ण करावा अस आम्ही सुचवू. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टी वर मतप्रदर्शन करण्यात अडचण येणार नाही. एकदा का ते जमलं की मग प्रत्येक पोस्ट वर आपली कोमेंट असलीच पाहिजे हे एकच ध्येय. मग सुरवातीला कुणी "जस्ट मेंरीड" अस स्टेटस लिहिलं असेल तर त्यावर "अभिनंदन" कुणी "उद्या परीक्षा आहे" अस लिहीलं असल्यास त्यावर "बेस्ट लक" कुणी "इंडिया कॉलिंग ... वेटिंग फॉर फ़्लाईट " अस लिहिल असेल तर "हेंप्पी जर्नी" अश्या सध्या कोमेंट्सनी आपल्या कारकिर्दीला सुरवात करावी. पण खरा कोमेंटकर हा नुसती कॉमेंट करून थांबत नाही तर आपल्या कॉमेंट वर कोमेंट मिळवतो. त्यामुळे कॉमेंट देवाण घेवाण चालू रहाते. आपल्या कॉमेंट वर आलेल्या कॉमेंट वर कॉमेंट करण्याची संधी आपल्याला मिळते. एकदा हि कला अवगत झाली की मग "जस्ट मेंरीड" अश्या स्टेट्स वर "बेस्ट लक" अशी कॉमेंट , "उद्या परीक्षा आहे" अश्या स्टेटस वर "अभ्यास कर , फेसबुक नको " अशी कॉमेंट, "इंडिया कॉलिंग ... वेटिंग फॉर फ़्लाईट "अश्या स्टेटस वर "तिकीट कितीला पडलं ?" अश्या कोमेंट्स कराव्यात. आपोआप मग तो संवाद सुरु राहील. मात्र त्यासाठी आणखी एक गुण अंगी बाणवता यायला पाहिजे तो म्हणजे नोटीफिकेशन्स चा त्रास न करून घेणे. कारण आपण कोमेंट केलेल्या पोस्ट वर अनेक लोक कॉमेंट करतात आणि त्यामुळे आपल्याला अनेक नोटीफिकेशन्स येत राहतात. तो त्रास लाईककरांना नाही, त्यांनी एखादी गोष्ट लाईक केली की त्यांचा विषय संपला. पण कॉमेंटकरांना अश्या नोटीफिकेशन्स चा त्रास न होता त्या कडे कॉमेंट करण्याची आणखी एक संधी ह्या दृष्टीनी पाहता आलं पाहिजे. मग अश्या प्रत्येक नोटीफिकेशन् वर क्लीक करून संधी मिळताच त्यावर कॉमेंट करावी. काहीच सुचलं नाही, असही होईल कधी कधी, पण अश्याच कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी विधात्यानी स्माईलीज ह्या प्रकारची ची निर्मिती केली आहे, त्याचा वापर करावा. अश्या वेळी आपल्या चेहऱ्यावरची माशी देखील हलत नसली तरी स्मितहास्य करणारी :) , खो खो हसणारी :D , जीभ बाहेर काढणारी :P , डोळा मारणारी ;) अशी कुठली न कुठली स्माईली टाकून वेळ मारून न्यावी. तुम्ही खरच हसत आहात का किंवा डोळा मारत आहात का ? हि खात्री करून घेण्यासाठी कुणीही येत नाही , काळजी नसावी. अंतिम टप्प्यात कॉमेंटकरांनी आपल्या फ्रेंड्स लिस्ट मध्ये जास्तीत जास्त लाइककर जमवावेत कारण हाडाचा कॉमेंटकर हा मूळच्या पोस्ट पेक्षा त्याच्या कॉमेंट वरच अधिक लाईक्स मिळवून जातो. त्यावेळी हे लाइककर मित्र मदतीला धावून येतात. अश्या प्रकारे ज्या दिवशी तुम्हाला "अमुक अमुक अल्सो कोमेंटेड .." च्या ऐवेजी "तमुक तमुक लाईक्स युवर कोमेंट ..." अशी नोटीफिकेशन्स अधिक येतील त्या दिवशी तुम्ही खरे कोमेंटकर झालात अस समजण्यास हरकत नाही.
आता तुम्हाला शेअरकर व्हायचं आहे का ? जरूर व्हा पण त्या आधी थोडी पूर्व तयारी लागेल. नव्या शेअरकरांना पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे शेअर काय करायचं ? त्यासाठी इकडच्या "पेज" आणि "ग्रुप" ह्या गोष्टींचा शोध घ्यावा. पुण्यातल्या सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणेच हि पेजेस आणि ग्रुप्स सुद्धा तुम्हाला फेसबुक च्या गल्लो गल्ली सापडतील आणि मग ..... "वडा पाव फेंन्स" , "मी गजर लावून उशिरा उठतो" , "फटा पोस्टर निकला हिरो" , "आय स्पीक ओन्ली मराठी", "आवारा", "कावरा", "बावरा", "सावरा" असे दिसतील ते ग्रुप जोडून ठेवावेत. हे ग्रुप ( पुण्यातल्या सार्वजानिक मंडळांप्रमाणेच) का निर्माण झाले आणि ते काय करतात ह्याचा विचार अजिबात करू नये. शेअरकरांच काम एकच , हे ग्रुप जे काही पोस्ट करतील ते तेवढ्याच भक्तीभावानं आपण शेअर करायचं. एखादा सुविचार सुविचारासारखा लिहावा .. त्याचा फोटो तयार करून तो फोटो अपलोड करायची काय गरज ? किंवा "पाहिलं प्रेम कुणी विसरू शकलय का ?" ह्या नावाचा ग्रुप "साईबाबांचा दुर्मिळ फोटो" का लावत असेल ? असे प्रश्न तुम्हाला पडले तर तुम्ही कधीच शेअरकर होऊ शकणार नाही. तसच अधून मधून काही जादू च्या गोष्टी शेअर कराव्यात पण त्या सहज सहजी दाखवू नयेत. आंधी लाईक करा मग शेअर करा मग कॉमेंट करा मग L दाबा मग पांढऱ्या भिंतीकडे १० सेकंद पहा आणि मग इकडे पहा, जादू दिसेल ..अश्या अटी घालाव्यात. ज्या प्रमाणे हाडाचा कॉमेंटकर कॉमेंट करून थांबत नाही तर त्यावर कॉमेंट मिळवतो त्याच प्रमाणे हाडाचा शेअरकर हा नुसतं शेअर करून थांबत नाही तर आपण शेअर केलेलं काहीही दुसऱ्या ला शेअर करायला लावतो. त्यासाठी सुरवातीला "देव देवतांचे फोटो अपलोड करून" समोरच्याला ते शेअर केल्यास पुढच्या १० मिनिटात काहीतरी चांगलं घडेल अशी वर्षानुवर्ष चालत आलेली ऑफर द्यावी. त्यात सराईत झालात कि अंतिम टप्प्यात काहीही शेअर करताना समोरच्याला वैचारिक अथवा भावनिक आव्हानं घालावीत. उदाहरणार्थ "इमेंजीनेशन इज मोअर इम्पोर्टन्ट देंन नॉलेज - अल्बर्ट आईनस्टाईन " असा सुविचार लावून "शेअर , इफ यु एग्री" अस आव्हान द्यावं .किंवा "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी" असा फोटो अपलोड करून " शेअर, इफ यु लव युवर मदर " अश्या सत्व परीक्षेत समोरच्याला टाकावं. त्यामुळे जे खरे मातृभक्त आहेत ते किंवा आईनस्टाईनच्या विचारांशी ज्यांचे विचार जुळतात ते लोक तुम्ही शेअर केलेल्या गोष्टी री-शेअर करून तुम्हाला १०० टक्के शेअरकर करतील.
आमचा हा लेख पुलंच्या "मुंबईकर पुणेकर आणि नागपूरकर" ह्या लेखावर आधारीत आहे हे सुज्ञास सांगणे न लगे. परंतु हाच लेख पुलच्यांच "मी आणि माझा शत्रुपक्ष" ह्या लेखावर आधारीत असावा अशीही एक सूचना होती पण काही नागरिकांच्या भावना त्यामुळे दुखावल्या जाण्याची शक्यता असल्यानं ती सूचना अवलंबण्यात आलेली नाही. आता हा लेख आम्ही फेसबुक वर प्रदर्शित केला की लाईककरांनी तो लाईक करावा ही विनंती , कोमेंटकरांनी त्यावर कॉमेंट करावी ही विनंती आणि शेअरकरांना त्यांनी शेअर करावा ही विनंती , पण अर्थात .... "शेअर , इफ यु एग्री".
- कौस्तुभ सोमण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा